Tuesday, July 02, 2024 11:42:03 PM

हार्बर रेल्वे मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक

रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावर ३८ तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात बेलापूर ते पनवेल मार्गावर एकही ट्रेन धावणार नाही. तसेच मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेंचंही वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यामुळं आता गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून मुंबईत परतणाऱ्या लोकांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

रेल्वेकडून जेएनपीटी-दिल्ली मार्गावर डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रेल यार्डच्या रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल ते बेलापूर दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मेगाब्लॉक दरम्यान हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर बेलापूर ते पनवेल दरम्यान रेल्वे सेवा बंद राहणार आहे.

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई परिवहनच्या २८ ज्यादा बसेस धावणार आहेत. पनवेल-बेलापूर दरम्यान २८ एनएमएमटी बसच्या २३२ फेऱ्या असतील. तर राज्य परिवहन (एसटी) बसेसही नागरिकांनासाठी वाहतुकीचा पर्याय असेल. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांवरून सुरू असेल. ट्रान्स हार्बर मार्गावर, ठाणे ते नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यान गाड्या धावतील. ब्लॉकनंतर पनवेलकडे जाणारी पहिली लोकल सीएसएमटीहून दुपारी १२.०८ वाजता सुटेल आणि २ ऑक्टोबर रोजी दुपारी १.२९ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे पनवेलहून पहिली लोकल दुपारी १.३७ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला दुपारी २.५६ वाजता पोहोचेल.


सम्बन्धित सामग्री