Friday, July 05, 2024 03:19:50 AM

भीषण अपघातात एसटी कंडक्टरचा चिरडून अंत

भीषण अपघातात एसटी कंडक्टरचा चिरडून अंत

नवी मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता एसटी आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी कंडक्टर हे जागीच ठार झाले आहेत. तर ट्रेलरमधील चालक हा गंभीर जखमी झाला असून, कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर ठाणे डेपोची उमरगा ते ठाणे ही एसटी महामंडळाची बस, पुण्याहून मुंबईकडे चालली होती. रसायनीजवळ आल्यानंतर एसटी चालकाने प्रवाशी उतरवण्यासाठी महामार्गावरील रिसवाडी उड्डाणपुलाजवळ शोल्डर लाईनला एसटी उभी केली. यावेळी बसमधील प्रवाशांना कंडक्टर शिवराज माळी यांनी खाली उतरवलं. माळी हे एसटीच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. याच वेळी काही मिनिटांतच पाठीमागून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरने रिसवाडी उड्डाणपुलाजवळ शोल्डर लेनला उभ्या असलेल्या एसटीला मागून जोरात धडकली.

हा अपघात एवढा भीषण होता की, एसटीच्या मागे उभे असलेले कंडक्टर शिवराज माळी हे या दोन्ही वाहनांच्या मध्ये अडकले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रेलर चालकाला महामार्गावर उभी असलेली एसटी दिसून न आल्याने ट्रेलर चालकाचा ट्रेलरवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असं सांगितले जात आहे. या अपघातामध्ये एसटीतील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातामध्ये ट्रेलर चालकाच्या पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


सम्बन्धित सामग्री