Wednesday, October 02, 2024 11:12:50 AM

जामिनावर सुटलेल्या आरोपीची वाजत गाजत मिरवणूक

जामिनावर सुटलेल्या आरोपीची वाजत गाजत मिरवणूक

कोल्हापूर, २४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: कोल्हापूर येथे खून आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पाचगाव येथील आरोपी मिलिंद पाटील आणि गणेश कलगुटकी जामिनावर सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी पाच गावातील एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही आरोपींसह इतर १३ ते १४ व्यक्तींचा समावेश असून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक बालाजी हांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिलिंद पाटील आणि गणेश कलगुटकी हे खून, खुनाचा प्रयत्न यांसह अन्य गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे दोघेही २१ सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास कळंबा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटले. यानंतर मिलिंद पाटील आणि गणेश कलगुटकी यांच्यासह इतरांनी विना परवाना मिरवणूक काढून, असभ्य वर्तन करून, भररस्त्यात बिअरची बाटली फोडून तसेच रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या लोकांना रहदारीस अटकाव केला. त्यानुसार फिर्यादी यांनी सरकारतर्फे माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतही पोलिसांनी पाऊले उचलली आहेत.

जामिनावर सुटलेल्यांची मिरवणूक निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. काहींनी तो सोशल मीडियावर स्टेटस ठेवला होता. त्यानंतर याची चर्चा शहरासह जिल्ह्यात झाली. हाच व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचला. त्यामुळे त्यांनी कारवाईचा बडगा उगारत पाचगावातील एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून यात मिलिंद अशोक पाटील, गणेश विलास कलगुटकी, महेश अशोक पाटील, रोहित दीपक भाले, मुन्ना उर्फ निशान नंदकुमार माने, निवृत्ती कांबळे, प्रणव तिळे सर्व रा. पाचगाव, ता. करवीर, सनी झेंडे रा. संभाजीनगर, प्रभू गायकवाड रा. जोशीनगर, कोल्हापूर यांच्यासह इतर पाच ते सात व्यक्तींचा यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

        

सम्बन्धित सामग्री