Wednesday, July 03, 2024 03:45:11 AM

नागपूरच्या पावसाची अंगावर काटा आणणारी कहाणी

नागपूरच्या पावसाची अंगावर काटा आणणारी कहाणी

नागपूर, २४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: नागपूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेला तुफान पाऊस नागरिकांना धडकी भरवणारा ठरला. संपूर्ण शहर जलमय करणाऱ्या या पावसामुळे घरात पाणी शिरून दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि काहीच मिनिटांतच शहर जलमय झाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले व घराघरांत पाणी शिरले. दुचाकी-चारचाकी वाहने वाहात गेली. सखोल वस्त्यांमध्ये बोटी फिरवून रहिवाशांना घरातून बाहेर काढावे लागले. रहदारीच्या सीताबर्डी आणि पंचशील चौकात कधी नव्हे इतके पाणी साचले. या दोन्ही चौकांत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने बचावकार्य केले. घरांतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, दुचाकी-चारचाकी गाड्यांचे; तसेच व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. नाग नदीची सुरक्षा भिंत कोसळल्यानेही अनेक घरांत पाणी घुसले.

महेशनगर भागात पाणी साचले असतानाच एका महिलेने घराचा दरवाजा उघडला. त्यामुळे पाण्याचा लोट घरात आला व एकट्याच राहणाऱ्या मीराबाई कप्पूस्वामी पिल्ले (७०) यांचा तोल गेला. घरात साचलेल्या पाण्यातच पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू ओढवला. अशीच दुर्घटना महेशनगर परिसरातील एका घरात ओढवली. संध्या श्यामराव ढोरे (५०) यांचाही पुराचे पाणी घरात शिरल्याने मृत्यू झाला. संध्या व त्यांच्या आई सयाबाई ढोरे (७२) या एका खोलीत राहायच्या. नातेवाईकांनी संध्या यांना पलंगावर ठेवले. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

        

सम्बन्धित सामग्री