Wednesday, July 03, 2024 03:35:35 AM

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ

विदर्भ मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ

नागपूर शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. तसेच अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं पहायला मिळालं.काल सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवर चक्क गुडघाभर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. तसेच सखल भागांत असलेल्या सोसायटी आणि घरांतही पावसाचे पाणी शिरले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचे पाणी व सांडपाणी याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने कुठलीही उपाय -योजना केली नाही. त्यामूळे गंगापूर शहरातील घरात व दुकानासह अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, बशीर शेख यांच्या घराची भिंत पडली आहे. तरी पालिका प्रशासनाकडे या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे.

नाशकातही मुसळधार पाऊस

नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर धरणासह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून रात्रीच्या सुमारास ६७५२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. पाणी सोडल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या या भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे.

भंडाऱ्यातही विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

शुक्रवार दुपारपासून ते सायंकाळपर्यंत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र रात्री १२ नंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या तिन्ही जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. वीज कडकडामुळे काही भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला असून तो पाऊस थांबल्यावरच पूर्ववत होणार आहे. तर भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यात शेती पाण्याखाली गेली असून अनेक मार्ग जलमय होऊन वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. वैनगंगा नदी ही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणाचे एकूण दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ असून अद्याप या मुसळधार पावसामुळे कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

गोंदियात मुसळधार पावसामुळे काही भागातील रस्ते बंद

गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसापासून सतत पाऊस पडत असून यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे सालेकसा तालुक्यातील नानवा आणि घोंसी या गावाला जोडणारा रस्ता नाल्याला पूर आल्यामुळे बंद झाला आहे. यामुळे परिसरातील आठ ते नऊ गावांच्या तालुक्यासी संपर्क तुटला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ब्रिटीशकालीन हाजरा फॉल धबधबा ओसंडून वाहू लागला

तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव हे पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन असणारा हाजरा फॉल धबधबा हा पावसाच्या पाण्यामुळे सध्या ओसंडून वाहत आहे. या धबधब्याचे रोद्र रूप सध्या पहावयास मिळते आहे. धबधब्याच्या आसपासचा परिसर जलमय झाला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी हा धबधबा तात्पुरता बंद ठेवण्यात आलेला आहे.

           

सम्बन्धित सामग्री