Wednesday, July 03, 2024 04:02:26 AM

नागपुरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

नागपुरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

नागपूर, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू होता. २२ सप्टेंबर संध्याकाळनंतर पावसाने अधिकच जोर धरला. रात्री तर विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस पडला. त्यामुळे अंबाझरी तलाव तुडूंब भरला. या तलावाचे पाणी नागपूरच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सीताबर्डी परिसरात भरलं आहे. एखादी नदी वाहावी इतक्या प्रचंड प्रमाणात तलावाचं पाणी सीताबर्डी परिसरात वाहत आहे. वस्त्या वस्त्यांमध्ये हे पाणी शिरलं आहे.

मोरभवन बस स्थानकाला तर नदीचं स्वरूप आलं आहे. बस स्टॉपमध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलं आहे. या पुराच्या पाण्यात ८ ते १० एसटी बस अडकल्या आहेत. बस पाण्यात अडकल्याने वाहक आणि चालकांनी एसटीच्या टपावर जाऊन आश्रय घेतला. रात्रभर हे वाहक आणि चालक एसटीच्या टपावर होते. सात ते आठ जण एसटीच्या टपावर अडकून पडले आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान मदत कार्य करत आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1705408976819790230

        

सम्बन्धित सामग्री