Sunday, July 07, 2024 12:09:13 AM

पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडले

पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडले

पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे रुळावर पुलाचा सांगडा उभारणे बाकी आहे. ठेकेदार कंपनीकडून हा सांगडाही तयार करण्यात आला असून, त्यास रेल्वेची मान्यता मिळत नसल्याने, या पुलाचे काम रखडले आहे. महापालिका प्रशासनाने रेल्वेला याबाबत विनंती केल्यानंतरही त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही.

घोरपडी परिसरातून रेल्वेचे दोन रूळ जातात. एक रूळ हा पुणे-मिरज आणि दुसरा रूळ हा पुणे-सोलापूर असा आहे. या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेचे २०१६ पासून प्रयत्न सुरू आहेत. घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवर क्रॉसिंग असून, तेथे उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मुंढवा, खराडी, कल्याणीनगर हा पूर्वेकडील भाग मध्यवर्ती पुण्याशी घोरपडी गावातील अरुंद रस्त्याने जोडला गेला आहे. पुणे-सोलापूर या रेल्वे लाइनवर रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने, वारंवार रेल्वे द्वार बंद करण्यात येते. घोरपडी गावातील रस्ता अरुंद असून, रस्त्याच्या दुर्तफा दुकाने असून, स्थानिकांना रहदारीसाठी एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

महापालिका प्रशासनाने थोपटे चौकालगतच्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू केले आहे. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट क्राँक्रिटद्वारे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. रेल्वे रुळावर लोखंडी सांगाडा उभारून त्यावरून वाहतूक ये-जा करणार आहे. हा सांगडा बनविण्यासाठी रेल्वेने नियुक्त केलेली कंपनी असून ती सासवड येथे आहे. हा सांगाडा कसा असावा, यासाठी आवश्यक असलेली सल्लागार कंपनीही रेल्वेने नियुक्त केलेली आहे. महापालिका प्रशासनाने त्यानुसार हा सांगडा सासवड येथील कंपनीकडून तयार केला आहे. त्या सांगाड्याची रेल्वे प्रशासनाकडून तेथे जाऊन तपासणी केली जाते. त्यानंतर तो सांगाडा पूर्णपणे खोलण्यात येईल आणि तो घोरपडी येथे आणून उभारण्यात येईल. त्यानंतर रेल्वेची पुन्हा तपासणी होईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येईल.

महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यातही रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून सोलापूर येथे तयार झालेल्या सांगाड्याची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या सांगाड्याची तपासणी झाल्यानंतरच पुढील काम सुरू करण्यात येणार आहे.

           

सम्बन्धित सामग्री