Sunday, October 06, 2024 09:14:45 PM

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गणरायाचे आगमन

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गणरायाचे आगमन

पंढरपूर, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे सर्वत्र उत्साहात आगमन होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये परंपरेप्रमाणे गणरायाचे आगमन झाले. मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. विठ्ठल मंदिरामध्ये शेकडो वर्षापासून हाताने बनवलेला संपूर्ण पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतींपैकी एक म्हणजे लालबागचा राजा.. लालबागच्या राजाची पहाटे पाच वाजता प्राणप्रतिष्ठा झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळी सहा वाजल्यापासूनच रांग लागली आहे.

चिंचपोकळीचा बाप्पा

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालीय. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या प्राण प्रतिष्ठेला सुरुवात झाली. त्याआधीच मुखदर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात.

राज ठाकरेंच्या घरी बाप्पा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आज बाप्पाचं आगमन झालं. कुटुंबासह पूजाअर्चना करत राज ठाकरे कुटुंबियांनी बाप्पांचं एकत्रित दर्शन घेतले.

तटकरे कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान

देशभरात मंगळवारपासून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. अनेक नेते अभिनेतेही लाडक्या बाप्पांच्या आगमनाने सुखावले आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या गीताबाग या निवासस्थानी गणराया विराजमान झाले आहेत. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह आमदार अनिकेत तटकरे आणि कुटुंबीयांनी भक्तीभावाने गणेशाची प्रतिष्ठापना केली. 'शेतकऱ्यांवरील सर्व संकटे दुर होऊ दे' असे साकडे अदिती तटकरे यांनी यावेळी घातले.

कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष

कोल्हापूर शहरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वच गणेश भक्त बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आतुर आहेत. शाहुपुरी,गंगावेश कुंभार गल्ली येथे घरगुती गणपती बाप्पा घेऊन जाण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली बघायला मिळत आहे.

वाजतगाजत बाप्पाचे स्वागत

परंपरागत पद्धतीने लेझीम खेळत आणि ढोलताशे वाजवत उत्साहात बाप्पाचे स्वागत ठिकठिकाणी सुरू आहे. सांगलीतील गावभागातील विसावा गणेश मंडळ आजही शिवरायांच्या काळातील पारंपरिक खेळ मानला जाणार लेझीम खेळत गणरायाचे स्वागत करत आहे.

जळगाव - शहराच्या मानाच्या गणपतीचं जल्लोषात आगमन

जळगाव महानगरपालिकेच्या प्रांगणात जळगावच्या मानाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. जळगाव महानगरपालिकेचा मानाचा गणपती म्हणून या गणरायाची ओळख आहे. वाजत गाजत या मिरवणुकीमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ढोल ताशाच्या वाद्यावर ठेका धरला.

भाजप आमदार गणेश नाईक गणरायाच्या चरणी

नवी मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांनी लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांनी कुटुंबासह वाशी येथील नवसाला पावणाऱ्या महाराजाचे दर्शन घेतले. यावेळी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर भारताच्या जनतेला अर्पण होणार असून हा देश प्रभू श्री रामाच्या विचारावर चालत राहो', अशी प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे.

रायगडमध्ये घरोघरी गणरायाचं वाजत गाजत आगमन

गणेशोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणले आहे. अनेक गणेशभक्तांनी आदल्या दिवशी संध्याकाळीच तर अनेक गणेशभक्त मंगळवारपासून गणेश मूर्ती घरी आणत आहेत.

राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या घरी गणरायाचे आगमन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले.

येवल्यात गणरायाचे जल्लोषात आगमन

येवला शहरासह परिसरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे. शहरातील गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी झांज, लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत केले.

सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या गणेशोत्सव सोहोळा

सांगली गणपती पंचायतन संस्थांच्या गणेशोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेदहा वाजता राजवाड्यातील दरबार हॉल येथे सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि राणीसाहेब यांच्या हस्ते श्रीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा करण्यात आली. गणपती मंदिरातून शाही पालखीतून संस्थानाच्या सरकारी गणपतीचे वाजत गाजत दरबार हॉल येथे आगमन झाले. यावेळी व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि संस्थानाच्या प्रतिनिधीने पालखीचे स्वागत केले. यानंतर दरबार हॉल येथे राणीसाहेब यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर दरबार हॉलमध्ये संस्थान गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मीराजे यांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली.

होडीतून गणरायांचे आगमन

काजळी नदीच्या पात्रातून गणपती आणले जातात तोणदे आणि हातिस गावाला जोडणारी ही नदी आहे. श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात तोणदे गावात ग्रामस्थ गणरायांना बोटीतून घरी घेवून येतात. त्यावेळी दळणवळणाची साधने नव्हती त्यामुळे गणपती कसे घरी आणले जायचे, हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी आजही ही परंपरा कायम कायम आहे.

नागपूरचा टेकडी गणेश

महाराष्ट्राचे आराध्यदैवत बाप्पाचे आज सर्वत्र थाटात आगमन झाले आहे. नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात मंगळवारी सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेला लोकांनी एकच गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून टेकडी गणेश मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे.

गणपती संग्रहालय

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात मोठा येथे नंद उद्यान गणपती संग्रहालय बनविण्यात आले आहे. या संग्रहालयात देश विदेशातील गणपती मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. जवळपास पाच हजाराहून अधिक लहान मोठ्या गणपती मूर्ती या संग्रहालयात आहेत.


सम्बन्धित सामग्री