Friday, July 05, 2024 03:03:11 AM

ओबीसी समाजाचे चंद्रपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन

ओबीसी समाजाचे चंद्रपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन

चंद्रपूर, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ओबीसी समाजाने चंद्रपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. रविंद्र डांगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये येऊन मागण्या पूर्ण करून आंदोलन सोडवावे, अशी मागणी आंदोलक करत आहे. राज्य शासनाच्यावतीने सोमवारी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यानंतर तब्येतीची काळजी वाटते असे सांगत आंदोलकांनी साखळी उपोषण करावे पण एका व्यक्तीने बेमुदत उपोषण करू नये, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा

नागपूरमध्ये कुणबी कृती आंदोलन समितीच्यावतीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीत ओबीसी प्रतिनिधींचाही समावेश करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

गोंदियात ओबीसी आले रस्त्यावर

गोंदियात ओबीसी समाजाचे सदस्य आंदोलनासाठी रस्त्यावर आले, त्यांनी सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढला. ओबीसींची जातजनगणना करावी तसेच इतर कोणत्याही समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये अशा दोन प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.

तुळजापूरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी तुळजापूर शहरात मोर्चा काढण्यात आला. तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोर येऊन सरकारला सद्बुद्धी दे असं मागणं मागण्यात आलं मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भीक नको हक्क मागतोय धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री