Friday, July 05, 2024 02:22:10 AM

गोकुळ दूध संघाची सभा वादळी ठरण्याची चिन्हे

गोकुळ दूध संघाची सभा वादळी ठरण्याची चिन्हे

कोल्हापूर, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: १५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची ६१ वी सर्वसाधारण सभा गोकुळ शिरगाव येथील पंचतारांकित वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य येथील मैदानात पार पडणार आहे. तर याच वार्षिक सभेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले असून दोन्ही बाजूने गेले पंधरा दिवस जिल्ह्यात संपर्क दौरे आयोजित करून सभासदांच्यापर्यंत भूमिका मांडण्याचाही प्रयत्न केला गेला. दरम्यान गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पत्रकार परिषद घेत सभासदाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जातील. तसेच विरोधी गटातील लोकांची जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत सभा सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे म्हणत विरोधकांनी ही सभा शांततेत पार पाडावी, असे आवाहन डोंगळे यांनी केले आहे.

तसेच विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी स्वतंत्र संपर्क दौरे केले. शिवाय विरोधी गटातील प्रश्न हे द्यायची अंतिम तारीख आणि वेळ दिलेली असताना देखील त्यांनी मुद्दाम उशिरा आम्हाला त्यांचे प्रश्न दिले या मागे त्यांचा काय हेतू होता हा मला अद्याप समजला नाही, असे म्हणत शौमीका महाडिक यांच्यावर टीका केली. तसेच या सभेला सत्ताधारी गटाच्या दोन्ही नेत्यांना आमंत्रित केल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान विरोधी गटाच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी देखील पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.

सतेज पाटलांना केवळ महाडिकांचे टँकर, महाडिकांचा ठेका या दोन गोष्टी सोडून त्यांना गोकुळ बद्दल जास्त काही माहीत नाही. त्या पलीकडे गोकुळबद्दल माहिती करून घेण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्यात नाही, असे मला वाटते म्हणत गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी जोरदार टीका केली आहे. यासोबतच गोकुळमध्ये सत्ताधारी मंडळींकडून लहान सहान गोष्टीत राजकारण सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दूध उत्पादक व संस्था अमूलकडे वळत आहेत. गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या नीतीमध्ये आणि कामकाजात बदल केला नाही तर गोकुळसाठी ही चिंतेची बाब असेल, असे शौमिका महाडिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केली असून आम्ही सत्तेत होतो त्यावेळी ते महादेवराव महाडिकांना सभेत बसण्याचा अधिकार काय असे विचारत होते. मग आता आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांना या सभेत येण्याचा संबंध काय ? ते कोणत्या अधिकाऱ्याने येऊन बसतात, असा सवालही उपस्थित केला असून आमची सत्ता होती त्यावेळी गोकुळ बचाव कृती समिती स्थापन झाली होती? ती आता कुठे गेली त्यांना शोधण्याची वेळ आली आहे. मी इतके संपर्क दौरे केले. मात्र या दौऱ्यात या कृती समितीमधील एक ही माणूस मला दिसला नाही. असा टोलाही यावेळी त्यांनी सतेज पाटलांना लगावला. यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना सुरू झाला असून गोकुळची ही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडणार की नेहमीप्रमाणे गोंधळात याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.


सम्बन्धित सामग्री