Monday, July 08, 2024 02:07:25 AM

१६ ते १९ सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर वाढणार

१६ ते १९ सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर वाढणार

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेल्या प्रणालीचा राज्याला पावसाच्या दृष्टीने फारसा फायदा झालेला नसला, तरी बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील अंतर्भागालाही फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रणालीमुळे १६ ते १९ सप्टेंबर या दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो.

विदर्भात आज, बुधवारपासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात उद्या, गुरुवारपासून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, जळगाव, धुळे येथेही उद्या, गुरुवारपासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. हे क्षेत्र आज, बुधवारनंतर तीव्र होऊ शकते. या क्षेत्रासह आता आयओडीही सकारात्मक होत असून या दोन्हींचा फायदा राज्याला होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेली प्रणाली तीव्र न झाल्याने राज्यात फारसा पाऊस पडला नाही. या काळात जळगाव, मराठवाड्यातील काही भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक पावसाची गरज आहे. सध्या सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. या आठवड्यात निर्माण झालेल्या प्रणालीचा फायदा महाराष्ट्राच्या अंतर्भागात होऊ शकतो, असेही नायर यांनी स्पष्ट केले.

ही प्रणाली वायव्येकडे सरकल्यावर त्याचा कोकणातही प्रभाव दिसू शकेल. मंगळवारी वर्तवलेल्या पुढच्या पाच दिवसांच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात मात्र शनिवारपर्यंत मध्यम स्वरूपाच्याच सरींची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री