Tuesday, September 17, 2024 01:42:45 AM

इमारतीतील लोखंडी सळई डोक्यात घुसली, पुण्यात २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

इमारतीतील लोखंडी सळई डोक्यात घुसली पुण्यात २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

पुणे, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: नियोजित गृह प्रकल्पाच्या आवारात सळई पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पुण्यातील हडपसर भागात घडली. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विठ्ठल गडदे वय २९ वर्ष (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदार अशोक किसन शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडदे याची पत्नी वर्षा वय २९, हिने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील मांजरी बुद्रुक परिसरात गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. गृह प्रकल्पात चौथ्या मजल्यावर गडदे काम करत होता. त्यावेळी गडदे याच्या डोक्यात सळई पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. गडदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

बांधकाम ठेकेदार शिंदे याने बांधकाम मजूर गडदे याला सुरक्षाविषयक साधने पुरविली नसल्याचे तपासात उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरे अधिक तपास करत आहेत.

     

सम्बन्धित सामग्री