Sunday, July 07, 2024 12:20:36 AM

'आयएनएस शंकुश'चे आयुर्मान २० वर्षांनी वाढणार

आयएनएस शंकुशचे आयुर्मान २० वर्षांनी वाढणार

मुंबई, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: भारतीय नौदलाच्या ताफ्यात ३७ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पाणबुडीचे आयुर्मान आणखी २० वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा प्रकल्प माझगाव डॉकने हाती घेतला आहे. ‘आयएनएस शिशुमार’ श्रेणीतील ही ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडी असून ती मूळ जर्मन बनावटीची आहे.

१०० वर्षांपासून कार्यरत असलेला माझगाव डॉक शिपबिर्ल्डस लिमिटेड हा कारखाना पाणबुडी निर्मितीत देशात अग्रणी आहे. माझगाव डॉकचे पाणबुडी उभारणीत कौशल्य आहे. यामुळेच ८०च्या दशकात माझगाव डॉकने जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे ‘आयएनएस शाल्की’ व ‘आयएनएस शंकुल’ या एकाच श्रेणीतील दोन पाणबुड्या तयार केल्या होत्या. त्या मूळ जर्मन ‘एचडीडब्ल्यू’ श्रेणीतील होत्या. या दोन पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये तयार होण्यासाठी ‘आयएनएस शिशुमार’ श्रेणीतील दोन पाणबुड्या थेट जर्मनीत तयार करून भारतात आणल्या गेल्या. त्यामध्ये ‘आयएनएस शंकुश’चा समावेश होता. ती सप्टेंबर १९८६मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्यात आली. त्याच पाणबुडीच्या दुरुस्तीचे काम माझगाव डॉकने सुरू केले आहे.

या पाणबुडीच्या मध्यमकालीन कालमर्यादा दुरुस्तीचे हे काम आहे. ते तीन वर्षे चालणार आहे. यामध्ये सध्या ही पाणबुडी वेगवेगळ्या भागात उघडली जात आहे. या दुरुस्तीदरम्यान पाणबुडी पूर्ण उघडून त्यातून इंजिन व पंख वेगळे केले जातील. त्यानंतर पाणबुडीला नवीन इंजिन बसवले जाईल. जर्मन कंपनी थायसनक्रूप कंपनीचे हे इंजिन असेल. तसेच पाणबुडीला पुढे ढकलण्या महत्त्वाची कामगिरी बजाविणारे प्रॉपेलर म्हणजेच पंखदेखील दुरुस्तीसाठी जर्मनीला पाठविले जात आहेत. या दोन प्रमुख बदलांमुळे पाणबुडीचे आयुष्य तब्बल २० वर्षांनी वाढणार आहे,’ अशी माहिती माझगाव डॉकमधील सूत्रांनी दिली.

पाणबुडीला पाण्याखाली असताना प्राणवायूसाठी आवश्यक असलेले व्हॉल्व्ह व अन्य साहित्यदेखील दुरुस्तीदरम्यान बदलले जाणार आहे. मूळ पाणबुडीत ही सामग्री जर्मन बनावटीची होती. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत ही सामग्री मुंबईतील कंपनीकडूनच तयार केली जात आहे.

२,७२५ कोटी रुपयांचा प्रकल्प

कुठल्याची पाणबुडीचे आयुष्य हे सहसा ३० वर्षांचे असते. या स्थितीत ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडीने नौदलाला ३७ वर्षांची सेवा दिली आहे. त्यानंतर पुन्हा २० वर्षांनी कालमर्यादा वाढवली जाणार आहे. हे माझगाव डॉककडून होणारे कौतुकास्पद कार्य मानले जात आहे. हा दोन हजार ७२५ कोटी रुपयांचा प्रकल्प असेल. २०० प्रत्यक्ष व जवळपास ४०० अप्रत्यक्ष रोजगार यांत कार्यरत असेल.


सम्बन्धित सामग्री