Saturday, July 06, 2024 11:28:12 PM

bachu-kadu-protests-in-front-of-sachins-house-in-mumbai
सचिनच्या मुंबईतील घरासमोर बच्चू कडू यांचं निदर्शनं

सचिनच्या मुंबईतील घरासमोर बच्चू कडू यांचं निदर्शनं

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीतून सचिन तेंडुलकर यानं माघार घ्यावी, अशी मागणी करत प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी आज सचिनच्या मुंबईतील घरासमोर निदर्शनं केली. जाहिरातीतून माघार घ्या किंवा भारतरत्न परत करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. ऑनलाइन गेमिंग हा एक प्रकारचा जुगार आहे. त्यामुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अनेक राज्यांत बंदी असलेल्या या खेळाला सचिन तेंडुलकर यांनी प्रोत्साहन देऊ नये अशी मागणी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी केली होती. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. सचिन यांच्याकडून त्यांच्या मागणीला काहीच प्रतिसाद न आल्यानं आज कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या घरावर धडक देत आंदोलन केलं.

बच्चू कडू आणि त्याचे समर्थक घोषणांचे फलक घेऊन सकाळीच सचिनच्या घरावर धडकले. भारतरत्न नाही, मी तर जुगाररत्न… आम्हाला जुगार खेळून लाखोचे कर्ज करून घ्यायचे आहे, कृपया भीक द्या… चला तरुणांनो, माझ्यासोबत जुगार खेळा… लहान असो किंवा थोर, जुगाराची सवय लावून घ्या… अशा आशयाचे फलक आंदोलकांनी झळाकवले. यावेळी सचिन विरोधी घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन आवरतं घेण्यात आलं.

आंदोलनानंतर मीडियाशी बोलताना सचिन तेंडुलकरवर टीका केली. ‘सचिन तेंडुलकर हे भारतरत्न असल्यामुळं आम्ही हे आंदोलन करतोय. ते फक्त क्रिकेटपटू असते तर आम्हाला आंदोलन करायची गरज नव्हती. मात्र, ते भारतरत्न आहेत. त्यांच्याकडं नवी पिढी आदर्श म्हणून पाहते. या देशात भगतसिंह, अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्यांना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. ज्यांना भारतरत्न मिळाला त्यांनी गैरफायदा का घ्यावा? सचिन यांना जाहिरात करायचीच असेल त्यांनी आधी भारतरत्न परत करावा, अशी मागणी कडू यांनी केली. 'त्यांनी भारतरत्न परत केल्यास मटक्याचीही जाहिरात करावी, तीही सोडू नये, असा संताप कडू यांनी व्यक्त केला.

एक क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकर यांचा आम्हाला अभिमानच आहे, पण भारतरत्न सचिन यांनी ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणं योग्य नाही. त्यांनी एकतर भारतरत्न परत करावा किंवा जाहिरातीतून बाहेर पडावं. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळाजवळ तेंडुलकर यांच्या नावानं भीकपेटी व सूचना पेटी लावण्यात येईल, असा इशारा कडू यांनी दिला आहे.


सम्बन्धित सामग्री