Sunday, June 30, 2024 10:09:43 AM

shravani-somvar-grishneshwar-mandir-grishneshwar-temple
घृष्णेश्वर पूर्णस्थान ज्योतिर्लिंग

घृष्णेश्वर पूर्णस्थान ज्योतिर्लिंग

घृष्णेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगांमध्ये त्याचा समावेश होतो. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील दौलताबाद येथून सुमारे ११ किमी. अंतरावर वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांतही येथील उल्लेख सापडतात. हे ज्योतिर्लिंग पूर्णस्थान म्हणून ओळखलं जातं. बारावं ज्योतिर्लिंग म्हणून जगभर प्रसिद्ध असलेलं औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. या नंतर ज्योतिर्लिंग कुठेही प्रकट झालं नसल्याने या ठिकाणाला पूर्णस्थान म्हणून मान्यता आहे. या ठिकाणी भाविकांनी मागितलेला प्रत्येक नवस, मागणं पूर्ण होत असल्याची अख्यायिका आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख म्हणून परिचित आहे वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे मंदिर हे इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिरावरील नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. या संपूर्ण मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडांचे आहे. ४४ हजार ४०० चौरस फूट एवढा या मंदिराचा विस्तार आहे. या मंदिर परिसरामध्ये पाच-स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, यावर अनेक पौराणिक प्रसंग आहे. मंदिराच्या आवारातील लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवितात. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग आहे. कोणत्या काळात जावे ? घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरास जाण्यासाठी उत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देण्याचा हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. श्रावणाचा महिना भाविकांसाठी खास आहे. कसे जाल ? औरंगाबाद शहराचे विमानतळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. बस किंवा टॅक्सीच्या साहाय्याने येथून तुम्ही सहजपणे घृष्णेश्वर मंदिरात जाता येते. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून बस किंवा टॅक्सीच्या मदतीने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता. हे अंतर देखील ३० किमी. आहे. औरंगाबाद बसस्टँडवरुन तुम्ही वेरूळ लेण्यांसाठी बस पकडू शकता. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर या लेण्यांपासून सुमारे १ - २ किमी अंतरावर आहे.


सम्बन्धित सामग्री