Tuesday, July 09, 2024 01:51:27 AM

चांद्रयान - ३ मोहिमेच्या यशासाठी दगडूशेठ गणपतीला साकडे

चांद्रयान - ३ मोहिमेच्या यशासाठी दगडूशेठ गणपतीला साकडे

पुणे, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारताच्या चांद्रयान - ३ मोहिमेच्या यशासाठी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही, विविध फळांचे रस आणि सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पाच्या मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. त्याचबरोबर मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली. चांद्रयान - ३ चे लँडर संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयानाने १४ जुलैला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सुमारे सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही. नुकतेच २० ऑगस्टला, रशियाचे लुना २५ हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात कोसळले. याच कारणामुळे भारत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होणार आहे. नाशिकमध्ये चांदीच्या गणपती मंदिरात आरती नाशिकमध्ये रविवार कारंजा येथे चांद्रयान - ३ मोहिमेच्या यशासाठी शिवसेनेच्यावतीने चांदीच्या गणपती मंदिरात आरती करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री