Wednesday, July 03, 2024 12:53:56 PM

dont-eat-onion-if-you-cant-afford-it
'परवडत नसेल तर कांदा खाऊ नका'

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका

नाशिक, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कावर ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी संतापले असून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात आंदोलने करण्यात आली. तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सत्तेत असताना केंद्राच्या या निर्णयाबाबत असमन्वय दिसून येत आहे. अशातच पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया देत 'कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल', असे आश्वासन दिले आहे. यावेळी दादा भुसे म्हणाले की, कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. आणि त्यावर केंद्र सरकार निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल. काही वेळा कांद्याला २०० ते ३०० चा भाव मिळतो, तर काही वेळा २ हजारांपर्यंत भाव जातो. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावं लागतं. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान यावर भुजबळांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सहाजिक आहे. या प्रतिक्रियेवर दादा भुसे म्हणाले की, हा निर्णय झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आज बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे दर पडले किंवा काय झालं, हे या क्षणाला बोलणं बरोबर नाही. मात्र कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्यावतीने घेतली जाईल. तसेच या विषयासंदर्भात चांगलं मार्गदर्शन असेल. तर स्वागतच असेल. कारण कांद्याच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, असेही उत्तर दादा भुसे यांनी दिले. दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळायला हवा. ज्यावेळी आपण १ लाखांची गाडी वापरतो तसेच १० रुपये जास्त देऊन माल खरेदी करावा. आणि ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही असा अजब सल्लाही भुसे यांनी दिला.


सम्बन्धित सामग्री