Thursday, July 04, 2024 10:48:22 AM

epidemics-ravaged-the-state
राज्यात साथीच्या आजारांनी काढले डोकंवर

राज्यात साथीच्या आजारांनी काढले डोकंवर

मुंबई , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यात पावसाळ्यात सुरू झालेल्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डोळे येणे, इन्फ्ल्यूएन्झा, मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांची रुग्णालयात गर्दी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती जारी केली आहे. मागील काही दिवसांपासून डोळे येण्याची साथ वाढली होती. मात्र, आता हा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे राज्यातील मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे गडचिरोली आणि मुंबईतील असल्याची माहितीदेखील आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात एकूण ४ लाख २० हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या आहे. राज्यात १३ ऑगस्टपर्यंत चार लाखांच्या जवळपास डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. संसर्गाच्या मोठ्या उद्रेकानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले. डोळ्यांचा संसर्ग झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.डोळे आल्यानंतर काही दिवसांच्या अवधीत संसर्ग बरा होत असल्याने रुग्णांनी काळजी करू नये. मात्र, स्वच्छता पाळावी आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात इन्फ्ल्यूएन्झा ‘एच१एन१’ आणि ‘एच३एन२’ची सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार १५५ इतकी नोंदवण्यात आली आहे. दोन हजार १५५ रुग्णांपैकी १२६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इन्फ्ल्यूएन्झाचे सर्वच रुग्ण देखरेखीखाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गडचिरोली, मुंबईमध्ये मलेरियाचे ८० टक्के रुग्ण मलेरियाचे राज्यात एकूण ८ हजार ४० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. राज्यात मलेरियामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मलेरियाच्या एकूण रुग्णसंख्येच्या ८० टक्के रुग्ण गडचिरोली आणि मुंबईतील आहेत. गडचिरोलीत ३ हजार ५२६ आणि मुंबईत दोन हजार ८८६ मलेरिया रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. ७३८ वरून ५४६ इतकी रुग्णसंख्या आढळली आहे. सोबतच यंदाच्या आठवड्यात मुंबईतील डेंग्यूच्या साथीची रुग्णसंख्या ४३६ वरून २०८ वर आल्याची आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. मुंबईत डेंग्यूची एकूण रुग्णसंख्या १,३२३ इतकी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यवरून ४९ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


सम्बन्धित सामग्री