Thursday, July 04, 2024 10:49:54 AM

amol-kolhes-stake-in-pawars-beed-meeting
पवारांच्या बीडच्या सभेला कोल्हेंची दांडी

पवारांच्या बीडच्या सभेला कोल्हेंची दांडी

बीड , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मराठवाड्यात पहिलीच सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पवारांच्या स्वागतासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारीही केली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवारांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदी नव्याने नियुक्त झालेले आणि शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हेया सभेला दांडी मारणार आहेत. पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण बीडमधील सभेला उपस्थित राहणार नसल्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पक्षाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी असताना देखील खासदार कोल्हे यांची ही गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षात पडलेल्या फुटीनंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना साथ देत खांद्याला खांदा लावून लढण्याचे आश्वासन येवल्यातील सभेत कोल्हेंनी दिले होते. पण असे असतानाही खासदार कोल्हेंची सभेसाठीच्या गैरहजेरीने तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘बंडा’च्या वादळानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार आता राज्यभर फिरून बंडखोरांचे राजकीय मोपमापच करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील सभांपाठोपाठ पवारसाहेब पुढच्या दोन दिवसांत मराठवाड्यांनतर फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. यातच पवारसाहेबांच्या बीडमध्ये होणाऱ्या या सभेकडे राज्याचे लक्ष लागले असून ते या सभेच्या माध्यमातून विरोधकांसह फुटीर नेत्यांबाबत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


सम्बन्धित सामग्री