Thursday, July 04, 2024 10:49:21 AM

pawar-will-also-support-modis-dedication
'पवारही मोदींच्या समर्पणाला साथ देतील'

पवारही मोदींच्या समर्पणाला साथ देतील

 मुंबई , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुधवारी पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते कोणाच्याही कानपट्टीवर बंदूक ठेवतात आणि पक्षामध्ये घेतात. भाजपने इतरांचे पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष उभारावा, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली होती. आता राज ठाकरे यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोठा पक्ष आणि विश्वासामुळे लोक पक्षात येतात. आम्हाला फोडाफोडी करायची गरज नाही. पक्ष उभारण्यासाठी १८-१८ तास काम करावे लागते. पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी राज ठाकरेंना दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांचा आम्ही आदर करतो. आता आमच्यासोबत आलेल्या अनेक जणांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर त्यांनी टीका करू नये, अशी आमची इच्छा आहे. तरीही ते टीका करत असतील तर ते ती टीका अंतर्मनातून करत नाहीत. कारण शरद पवार यांना माहिती आहे की, देशासाठी सध्या सर्वात चांगले पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच आहेत. मोदींनी विकासाला गती दिली आहे. हे शरद पवारांना माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी पुन्हा येणार नाहीत असे भाकीत तुम्ही केले पण तुमचं हे भाकीत खरे होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम कुणी केले हे महाराष्ट्रातील जनतेने तुमचे सरकार असताना पाहिले आहे. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन शरद पवारांनी कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०१४ मध्ये सुद्धा मोदी आणि भाजपला साथ देईल. याबाबत शरद पवारांनी निश्चिंत राहावे.


सम्बन्धित सामग्री