Thursday, July 04, 2024 11:37:22 AM

the-determination-of-mns-should-be-gathered
मनसेचा निर्धार मेळावा

मनसेचा निर्धार मेळावा

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचा निर्धार मेळावा घेत आहे. यात राज ठाकरे यांचे जाहीर भाषण होणार आहे. या मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल्गार पुकारणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधिच्या पोस्टर्समध्ये 'रखडेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा' असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतात, कुणावर टीकेची झोड उठवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत व दुरावस्थेबाबत राज ठाकरे आजच्या निर्धार मेळाव्यात आपली रोखठोक भूमिका मांडून आपली पुढील राजकीय दीशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे मनसेने टोलनाक्याचे आंदोलन आक्रमकपणे हाताळले, त्याप्रमाणेच महामार्गाबाबतही मनसे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांना घेराव घालणे किंवा राज ठाकरे यांच्याकडून महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी अल्टिमेटम मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मनसेचा मेळावा होणार आहे. मेळाव्याला पनवेल आणि रायगडसह कोकणातील मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला 2007 मध्ये सुरुवात झाली. तब्बल 16 वर्षे काम सुरू होऊन झाले तरी महामार्गाचे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. यापूर्वीच्या कोकण दौऱ्यामध्येही राज ठाकरे यांनी या रखडलेल्या महामार्गावरून चांगलीच टोलेबाजी केली होती. राम वनवासात जाऊन, सीताला घेऊन, रामसेतू बांधून, रावणाला हरवून 12 वर्षांत परत येतो. मात्र, आपल्याकडे 16 वर्षे झाले तरी महामार्गाचे काम होत नाही, हे लाजिरवाणे असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.


सम्बन्धित सामग्री