Saturday, February 22, 2025 12:09:41 PM

98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
दिल्लीतील 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्यदिव्य प्रारंभ

पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

दिल्लीतील 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्यदिव्य प्रारंभ

दिल्ली येथे आजपासून रविवारपर्यंत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. या संमेलनाचे आयोजन सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत पारंपरिक पोशाख परिधान केलेले अनेक ग्रंथप्रेमी सहभागी झाले होते.

सकाळी जुन्या संसद भवनापासून निघालेल्या या ग्रंथ दिंडीने मराठी साहित्याचा गौरव दिल्लीच्या रस्त्यांवर झळकवला. विशेषतः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध रंगसंगतींनी सजवलेल्या चित्ररथांनी संमेलनाच्या भव्यतेत अधिक भर टाकली.

हेही वाचा : वंदे भारतच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेसचा कराल स्वस्त प्रवास लवकरचं

1878 पासून सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच उद्घाटन दोन वेळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे पहिले उद्घाटन होणार असून हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी मर्यादित असेल. विशेष म्हणजे, या उद्घाटन सोहळ्यात मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना मंचावर स्थान दिले जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक आणि रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

पहिल्या उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचीही उपस्थिती असेल.

हेही वाचा : नऊशे कोटींच्या सिडको प्रकल्पावरून भाजप-शिवसेनेत नव्या संघर्षाला तोंड?

नेहरूंनंतर मोदींच्या हस्ते उद्घाटन
दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला केवळ स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनाच प्रवेश असेल. इतरांसाठी सभागृहाबाहेर मोठ्या स्क्रीनवर उद्घाटन सोहळा दाखवला जाणार आहे.

दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात अनेक चर्चासत्रे, परिसंवाद आणि कवी संमेलने आयोजित करण्यात आली आहेत.


सम्बन्धित सामग्री