४ सप्टेंबर, २०२४, मुंबई : अगदी काहीच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरु होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी आपण मोठ्या भक्तिभावाने 'गणपती बाप्पा मोरया...' असं म्हणतो. पण, मुळात गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरया असं का म्हणतात ? मोरया हा शब्द नेमका कुठून आला ? असा प्रश्न मनात डोकावतो.
काय आहे कथा ?
गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे ६०० वर्ष जुनी कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. १३७५ मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. असं सांगितले जातं की, वयाच्या ११७ वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु नंतर वयपरत्वे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून, ते दुःखी असत. तेव्हा एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की, उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन.
दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणेशाने त्यांना दर्शन दिलं. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं. गणपतीसोबत इथे मोरया गोसावी यांचं नाव अशाप्रकारे जोडलं गेलं की, गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरया असं तिथले लोक बोलू लागले. पुण्यातल्या लहानशा गावी सुरु झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळली जाते आहे. आता जगभरात 'गणपती बाप्पा मोरया' असं म्हटलं जातं.