२१ ऑगस्ट, २०२४, मुंबई : मंडळी, आता सणवार सुरू झाले आहेत. त्या निमित्तानं घरोघरी पूजा, व्रतं होत असतात. या सणांच्या निमित्ताने आपण नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे जाणार तेव्हा मग आपण छान दिसलंही पाहिजे. पण, घराबाहेर पडायची वेळ आली की आपल्याला प्रश्न पडतो 'आज काय कपडे घालू ?' त्यामुळे असा प्रश्न पुन्हा पडू नये म्हणून सणांवारांना काय कपडे घालू शकतो याविषयी जाणून घेऊया.
सदाबहार साडी
सणवार सुरु झाले की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच भुरळ घालते ती म्हणजे सदाबहार साडी. सणासुदीमध्ये साडी नेसणं उठावदारआणि साजेस दिसतं. सणांवारात साडी अगदी चपखल बसते. त्यातही कांजीवरम, बनारसी सिल्क, खणाच्या साड्या आपलं सौंदर्य आणखी खुलवतात. एरवी जरीचं काम जास्त असल्यामुळे, जास्त नक्षीकाम असल्यामुळे ज्या साड्या वापरल्या जात नाहीत, त्या सणांच्या काळात एकदम चपखल बसतात. अशा साड्यांपासून घरातल्या लहानग्या नातीसाठी सुद्धा आपण छान साडी शिवून घेऊ शकतो. कारण, घरातल्या आजी, आई, वहिनी, ताई आणि लहानग्या नातीला सुद्धा साडीची भुरळ पडल्या शिवाय राहत नाही.
साडीपासून तयार केलेले ड्रेस
ज्या स्त्रियांना साड्यांची सवय नसेल, पण तरीही त्यांना पारंपरिक लूककरायचा असेल तर अशांसाठी साड्यांपासून हल्ली छान अनारकली ड्रेस, कुर्ता, सलवार कमीज असा ड्रेस किंवा अगदी घागरा चोळीसुद्धा आपण शिवून घेऊ शकतो. याशिवाय पूर्वापार चालत आलेल्या काही फॅशन आहेत जसं की, स्कर्ट, धोती, चनिया चोली, पलाझो, क्रॉप टॉप, शरारा यांचाही आपण वापर करू शकतो.
ओढण्या, श्रग्ज सनी केप्स
सणासुदीच्या काळात सगळेच छान रंगीबेरंगी कपड्यांत असतात... त्यामुळे आपण या काळात थोडे भडक कपडे घालू शकतो. किंवा आपल्याला खूप भडक कपडे आवडत नसतील तर आपण पूर्ण पेस्टल शेडमधील ड्रेस घालून त्यावर थोड्या भडक रंगाची ओढणी घेऊ शकतो. फिक्या रंगाची साडी नेसायची असेल तर त्यावर भडक रंगाचा ब्लाऊज घालू शकतो.
आता छान श्रग्स आणि केप - म्हणजेच काय तर ओढणीच्या कापडापासून तयार केलेलं जॅकेट पण तरीही थोडा वेगळा प्रकार... श्रग म्हणजे थोडं लांब जॅकेटच्या प्रकारात येतं आणि ते आपण सलवार कमीज, अनारकली ड्रेस यावर पण घालू शकतो...
केप हा सदरं ब्लाउज च्याच उंचीचं जॅकेटच्या प्रकारात येतं. त्यामुळे केप आपण साडीवर सुद्धा घालू शकतो. साडी किंवा ड्रेस चा रंग फिकट असताना श्रग आणि केपचा रंग आपण भडक आणि ठेवू शकतो. यामुळे आपण चारचौघींमध्ये छान उठून दिसू...
दागिन्यांची पूर्वतयारी
सणासुदीच्या काळात कपड्यांची निवड जितकी महत्त्वाची, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर घालायचे दागिने... असं बऱ्याचदा होतं कि आपण छान साडी नेसून किंवा ड्रेस घालून तयार होतो आणि मग त्यावर दागिने काय घालावेत असा प्रश्न पडतो... त्यामुळे आपल्यावर असा प्रसंग पुन्हा ओढावू नये म्हणून आपण दागिन्यांची पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं आहे. आपण जी साडी, किंवा ड्रेस घालणार असू, त्याच्याशी मॅचिंग अशा बांगड्या किंवा कडे, कानातले, गळ्यातले सेट किंवा माळा, हातात घड्याळं घालणार असू तर दागिन्यांवर जाईल असं घड्याळ म्हणजे सोनेरी दागिने घालणार असू तर सोनेरी घड्याळ आणि चंदेरी दागिने घालणार असू तर चंदेरी घड्याळ, अजून आवड असल्यास पैंजणं, अंगठी हे सर्व आदल्या दिवशीच निवडून बाजूला काढून ठेवा. त्यामुळे आयत्या वेळी आपली गडबड होणार नाही.
मिक्स अँड मॅच / फ्युजन
सणासुदीच्या काळात पारंपरिक आणि नवतेचं छान फ्युजन करून आपण एक नवीन लूक तयार करू शकतो. वेगवेगळ्या रंगांचं, ड्रेस स्टाइल्सचं मिश्रण करून आपण स्टायलिश दिसू शकतो. स्त्री पुरुष दोघेही कुर्ता जीन्स सोबतही घालू शकतात. एरवी न वापरता येणारे रंग, या काळात सहज घालता येतात. वेगवेगळ्या रंगाचं आणि त्या निमित्तानं स्वतःचा ‘स्टाइल कोशंट’ही तपासून बघता येऊच शकतो.
सणासुदीच्या काळात ‘कॅज्युअल विअर’ घालणं टाळा. जीन्स - टीशर्ट, फ्रॉक, वन पीस, स्कर्ट असे कपडे शक्यतो टाळा. कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, याचा विचार करून कपड्यांची निवड करा. पण, तरीही काहींना जर पूर्ण पारंपरिक लूक नको असेल. तर, लाँग गाऊन, जॅकेट्स, लॉंग स्कर्ट याला पारंपरिक कुर्ती, ओढण्या, दागिने यांची जोड देऊन छानपैकी ‘फ्युजन’ करू शकतो. मात्र, असं फ्युजन आधी करून पाहा, आपल्याला काय शोभत आहे काय नाही ते पाहा आणि मग कपडे निवडा.