मानवाच्या अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे झोप ही देखील तितकीच महत्वाची आहे. कारण, दिवसभराच्या दगदगीच्या कामानंतर प्रत्येकालाच थकवा जाणवतो आणि या थकलेल्या शरीराला पुरेशी झोप नाही मिळाली तर चिडचिडपणा, थकवा, कमी एनर्जी आणि स्मरणशक्ती कमी होणं अशा समस्या उद्भवतात. पण आता हे इतक्यावरच भागत नाही तर झोपपूर्ण न होण्यामुळे किंवा कमी झोप घेत असाल तर लठ्ठपणा, डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, झोपेच्या अभावामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. इनसोम्निया (झोपेची समस्या) असल्यास, शरीरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तणाव, डायबेटिस, चिंता, नैराश्य आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार, जगभरातील 10% ते 30% लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यामुळे त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. मात्र, जीवनशैलीत काही साधे बदल करून साउंड स्लीप (गाढ आणि शांत झोप) घेता येते आणि आरोग्य सुधारता येते.
साउंड स्लीप म्हणजे काय?
साउंड स्लीप म्हणजे गाढ आणि शांतपणे झोपणे अर्थात चांगल्या क्वालिटीची झोप घेणे. आता चांगली झोप घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे जाणून घेऊ:
> सकाळी लवकर उठणे – यामुळे रात्री लवकर झोप लागते.
> फोन आणि टीव्हीपासून दूर राहणे – झोपण्याआधी स्क्रीन वापरल्याने झोपेवर परिणाम होतो.
> पाय धुणे आणि मसाज करणे – यामुळे झोप चांगली लागते.
> हलके जेवण करणे – झोपण्यापूर्वी जड जेवण टाळावे.
> दूध पिणे आणि चालणे – हलकी चाल आणि कोमट दूध चांगली झोप देऊ शकते.
साउंड स्लीपचे फायदे:
1. मेंदू फ्रेश राहतो
दररोज 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने शरीर आणि मेंदू आरामशीर राहतो, मेंदूचे कार्यक्षमता सुधारते.
2. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते
झोप पूर्ण न झाल्यास लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि स्मरणशक्ती कमी होते. पुरेशी झोप घेतल्यास स्मरणशक्ती सुधारते आणि एकाग्रता वाढते.
3. मूड सुधारतो
नीट झोप न घेतल्यास चिडचिड, तणाव आणि नैराश्य वाढू शकते. पुरेशी झोप घेतल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि मूड आनंदी राहतो.
4. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
चांगली झोप घेतल्यास ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल संतुलित राहते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
5. वजन नियंत्रणात राहते
पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे जास्त भूक लागते आणि वजन वाढू शकते. 7-8 तासांची झोप घेतल्यास वजन नियंत्रित राहते.