१८ सप्टेंबर, २०२४, मुंबई : यंदा ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रीत देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. ३ ऑक्टोबरला (गुरुवार) घटस्थापना आहे. तर, १० ऑक्टोबरला (गुरुवार) अष्टमी आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. यामागे धार्मिक संदर्भ नसला तरीही फक्त आनंद लुटण्यासाठी बऱ्याच स्त्रिया प्रत्येक दिवशी हे रंग परिधान करताना दिसतात. तर, यंदाचे नवरात्रीचे रंग काय आहेत जाणून घेऊयात...
पहिली माळ - ३ ऑक्टोबर, २०२४ (गुरुवार) - पिवळा
आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्व आहे. पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे .पिवळा रंग हा ऊर्जेशी, आशादायी असण्याशी संबंधित आहे. संपन्न व्यक्तिमत्त्व, अध्यात्मात आवड, प्रगतीची ओढ असणं, इच्छाशक्ती, संघर्ष करायची तयारी, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, स्वाभिमान, स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी हे गुण हा रंग दर्शवितो.
दुसरी माळ - ४ ऑक्टोबर, २०२४ (शुक्रवार) - हिरवा
हिरवा रंग प्रगती, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग म्हणूनही ओळखला जातो.
तिसरी माळ - ५ ऑक्टोबर, २०२४ (शनिवार) - राखाडी
काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाने राखाडी रंग बनतो. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे. स्थिरतेचा, सुरक्षिततेचा, कौशल्याचा आणि शिस्तबध्दतेहा रंग म्हणून राखाडी रंग ओळखला जातो.
चौथी माळ - ६ ऑक्टोबर, २०२४ (रविवार) - केशरी
केशरी रंग हा त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने केशरी रंग तयार होतो. त्यामुळे दोन्ही रंगाचे गुणविशेष याही रंगात अंतर्भूत होतात. केशरी रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे.
पाचवी माळ - ७ ऑक्टोबर, २०२४ (सोमवार) - पांढरा
शुद्धता, स्वच्छता, पवित्रता आणि सरळपणा तसेच चांगुलपणा, निरागसपणा याचे प्रतिक म्हणजे पांढरा रंग. उद्दात विचारसरणी, समानता आणि आशावादाचंही पांढरा रंग प्रतिनिधित्व करतो.
सहावी माळ - ८ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) - लाल
चटकन डोळ्यात भरणारा लाल रंग प्रेम, उत्साह आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. लाल रंग इच्छाशक्ती, धैर्य, स्फूर्ती, संघर्ष, उत्तेजना, आवेग यांचेही प्रतिनिधित्व करतो.तसेच, लाल रंग शारीरिक ऊर्जेशी जोडला गेला आहे.
सातवी माळ - ९ ऑक्टोबर, २०२४ (बुधवार) - गडद निळा
निळा रंग हा विश्वासाचं, श्रध्देचं, सुस्वभावाचं, आणि आत्मियतेचं प्रतिक आहे. निळा रंग शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचे वैशिष्ट्य आहे. निळ्या रंगातून सागराची अथांगता आणि आकाशाची अमर्याद खोली यांची अनुभूती मिळते.
आठवी माळ - १० ऑक्टोबर, २०२४ (गुरुवार) - गुलाबी
गुलाबी रंग हा सकारात्मकतेचा, आशेचा आणि सेवा भावनेचा रंग आहे. गुलाबी रंग हा निरपेक्ष प्रेम, मृदुलता आणि नम्रतेचंही प्रतिनिधित्व करतो. तसेच, गुलाबी रंग आनंद आणि सर्जनशीलताही दर्शवतो.
नववी माळ - ११ ऑक्टोबर, २०२४ (शुक्रवार) - जांभळा
जांभळा रंग रहस्य, यश आणि क्षमतेचं प्रतीक आहे. जांभळा रंग प्रामाणिकता आणि भावनिकताही दर्शवतो. तसेच, जांभळा रंग बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाचेही प्रतिनिधित्व करतो.