Tuesday, September 17, 2024 01:15:20 AM

Festive Wear For Men
पुरुषांसाठी सणासुदीचे कपडे, जाणून घ्या फॅशन ट्रेंड्स...

आता सणवार सुरू झाले आहेत. सणांवारांना काय कपडे घालू शकतो याविषयी जाणून घेऊया.

पुरुषांसाठी सणासुदीचे कपडे जाणून घ्या फॅशन ट्रेंड्स 
MEN FASHION

२१ ऑगस्ट, २०२४, पुणे : मंडळी, आता सणवार सुरू झाले आहेत. त्या निमित्तानं घरोघरी पूजा, व्रतं होत असतात. या सणांच्या निमित्ताने आपण नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे जाणार तेव्हा मग आपण छान दिसलंही पाहिजे. पण, घराबाहेर पडायची वेळ आली की आपल्याला प्रश्न पडतो 'आज काय कपडे घालू ?' त्यामुळे असा प्रश्न पुन्हा पडू नये म्हणून सणांवारांना काय कपडे घालू शकतो याविषयी जाणून घेऊया. 

सदाबहार कुर्ता आणि पायजमा
स्त्रियांसाठी जशी सदाबहार साडी आहे तसं पुरुषांसाठी सदाबहार कुर्ता पायजमा. सणासुदीच्या दिवसांत कुर्ता-पायजमा हा पुरुषांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अनेक पुरुष याला पहिली पसंती देताना दिसतात. कारण ते कंफर्टेबल सुद्धा असतात. पूर्वी कुर्ता पायजमा घातला की पायजम्याला खिसा नसल्यामुळे  हातातलं सामान कुठे ठेवायचं हा प्रश्न पडायचा पण आता खिश्यांसहीत कुर्ता आणि पायजमासुद्धा मिळतो त्यामुळे हाही प्रश्न आता राहिला नाही.

खादी, सुती कापड यासोबतच आता छान लखनवी किंवा चिकनकारी नक्षीकाम असलेले कुर्ते, फुलांच्या नक्षीचे कुर्ते मिळतात. तसंच थोडा मराठमोळा, पारंपरिक लूकसाठी पुरुषांसाठीही साड्यांच्या कापडापासून बनवलेले कुर्ते किंवा पूर्ण साडीचं कापड नसेल तर साडीची काठ वापरून बनवलेले कुर्ते, खणाच्या कापडापासून बनवलेले कुर्ते सुद्धा हल्ली पुरुषांसाठी मिळतात.

 

बंद गळ्याचे जॅकेट
कुर्ता पायजम्यामध्ये आणखी उठावदार दिसण्यासाठी किंवा आपण आधीही वापरलेलया कुर्त्या- पायजम्याला एक नवीन लूक देण्यासाठी आपण त्यावर बंद गळ्याचे जॅकेट सुद्धा घालू शकतो. कोणतीही नक्षी नसलेला कुर्ता पायजमा असेल तर त्यावर नक्षी असलेलं जॅकेट उठावदार दिसेल.

आता पैठणीच्या जॅकेट्सची चलती आहे तर आपण पैठणीचे जॅकेटचा सुद्धा विचार करू शकतो. 


शर्ट पॅन्ट
कधी कधी कुर्ता पायजमा घालायचा फार कंटाळा येतो किंवा बऱ्याचदा काहींना कुर्ता पायजमा म्हणजे जरा अतीच होईल असाही वाटतं. तेव्हा आपण कुर्त्या - पायजम्यासारख्या एकदम पारंपरिक आणि जीन्स टी- शर्ट सारख्या अगदीच कॅज्युअल लूक च्या मध्येच असणाऱ्या शर्ट पॅन्टला निवडू शकतो. शर्ट पॅन्टमुळे आपण अगदीच औपचारिक दिसू नये म्हणून आपण शर्ट मध्ये काही प्रयोग करू शकतो. बाजारात पार्टी वेअर शर्टचा एक प्रकार मिळतो. ज्यात शर्टवर थोडीफार नक्षीकाम असतं. तर या प्रकारातलं शर्ट आणि त्यावर साजेशी पॅन्ट घालून आपण सणावाराला छान तयार होऊ शकतो.

 

धोती पॅन्ट/ पटियाला पायजमा
आपल्याकडे असणाऱ्या कुर्त्यासोबत वेगळी पॅन्ट घालून आपण नवा लूक तयार करू शकतो. आपल्याकडे असणाऱ्या कुर्त्यासोबत धोती किंवा पटियाला पायजमा घालून आपण एक नवीन लूक तयार करू शकतो. पुरुषांसाठी नेहमीच कोणत्याही कुर्त्यावर जातील अशा रंगाचे आपण धोती पँट्स किंवा पटियाला पायजमा घेऊनही ठेवू शकतो. साधारणपणे सफेद, मरून, सोनेरी, बिस्कीट रंग या छटांच्या धोती अंडी पतियाळा पायजमा घेतले तर ते कोणत्याही कुर्त्यावर जातात. 

 


मिक्स अँड मॅच / फ्युजन 
सणासुदीच्या काळात पारंपरिक आणि नवतेचं छान फ्युजन करून आपण एक नवीन लूक तयार करू शकतो. वेगवेगळ्या रंगांचं, ड्रेस स्टाइल्सचं मिश्रण करून आपण स्टायलिश दिसू शकतो. आपण कुर्ता जीन्स सोबतही घालू शकतो. एरवी न वापरता येणारे रंग, या काळात सहज घालता येतात. वेगवेगळ्या रंगाचं आणि त्या निमित्तानं स्वतःचा ‘स्टाइल कोशंट’ही तपासून बघता येऊच शकतो. 

सणासुदीच्या काळात ‘कॅज्युअल विअर’ घालणं टाळा. जीन्स - टीशर्ट शक्यतो टाळा. कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, याचा विचार करून कपड्यांची निवड करा. पण, तरीही काहींना जर पूर्ण पारंपरिक लूक नको असेल. तर फ्युजन करू शकतो पण फ्युजन आधी करून पाहा, आपल्याला काय शोभत आहे काय नाही ते पाहा आणि मग कपडे निवडा. 
 


सम्बन्धित सामग्री