नाशिक: सद्या संपूर्ण महाराष्ट्र गारठलाय. त्यातल्या त्यात थंड हवेचे ठिकाण म्हणजेच नाशिकमध्ये लोकांना हुडहुडी भरलीय लोकांबरोबरच नाशिकमध्ये आता बाप्पाला सुद्धा थंडी वाजत असल्याचं समोर आलाय. नाशकात नागरिकांना हुडहुडी भरली असल्याने लोक शेकोटीची उब घेताना दिसून येतात परंतु नाशकात गणपतीला शाल आणि स्वेटर घातल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे.
नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम आहे. नागरिक थंडीने हैराण असतानाच धार्मिक नागरी असणाऱ्या नाशिकमध्ये मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणेश मूर्तीला स्वेटर परिधान करून, शाल पांघरून बाप्पाचे थंडी पासून रक्षण केले जात आहे. या चांदीच्या बाप्पाचे सुंदर असे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे नाशिकच्या चांदीच्या गणपतीचे वैशिष्टये?
नाशिक हे धार्मिक आणि पौराणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात असंख्य इतिहास कालीन मंदिर आहेत. त्यात नाशिकचा मानाचा राजा समजला जाणाऱ्या चांदीच्या गणपतीचा देखील समावेश आहे. भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीची सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे शेकडो गणेश भक्तांच हे श्रद्धास्थान आहे.
नाशिकच्या रविवार कारंजा बाजारपेठ भागात हे चांदीचा गणपती मंदिर आहे. जवळपास 90 वर्षांची परंपरा या मंदिराला आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. त्यात रविवार कारंजा मित्रमंडळानेही सक्रीय भाग घेतला होता. रविवार कारंजा मित्र मंडळ हे ब्रिटिशकालीन असून स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरावर ब्रिटिश पोलिसांची करडी नजर होती. सन 1978 साली रविवार कारंजा मित्र मंडळाने गणपतीची मूर्ती चांदीची बसविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रविवार कारंजा बाजारपेठेतील व्यावसायिक आणि भाविक यांनी एकत्र येऊन चांदीचा गणपती बनविण्याची संकल्पना उचलून धरली आणि सर्वांच्या हातभारातून चांदीची मूर्ती प्रत्यक्षात साकारली गेली. त्यानंतर रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती नाशिककरांचे आकर्षण ठरू लागला.
दरम्यान रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणेश मूर्तीला स्वेटर परिधान करून, शाल पांघरून बाप्पाचे थंडी पासून रक्षण केले जात आहे. या चांदीच्या बाप्पाचे सुंदर असे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपूर्ण जगाचा पालनहार आता स्वेटर घालून सर्वांचं रक्षण करतोय.