पालघर : शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. श्रीनिवास वनगा यांना यंदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली नाही. यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा घरातून निघून गेले आहेत. ते बेपत्ता आहेत. घरातून बाहेर पडतेवेळी त्यांनी मोबाईल बंद केला. यामुळे सध्या श्रीनिवास वनगा कुठे आहेत हे मोबाईलच्या मदतीने शोधणे कठीण झाले आहे.
उमेदवारी मिळत नाही याची खात्री झाल्यानंतर वनगा एकदम निराश झाले. ते घरातच काही वेळ रडत होते. नंतर मोबाईल बंद करुन ते घराबाहेर पडले आणि चालत अज्ञातस्थळी निघून गेले; एवढीच माहिती घरच्यांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस मिळालेल्या माहितीआधारे वनगांचा शोध घेत आहेत. वनगांच्या ओळखीच्या लोकांकडे त्यांच्याबाबत चौकशी सुरू आहे.
वनगा रडले... त्यांच्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेविषयी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेण्यात आली. यावेळी राऊतांनी प्रतिक्रिया म्हणून वनगांच्या अवस्थेवर हसणे पसंत केले.