भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी पुत्र जयपाल भांडारकर यांनी लग्नाच्या हंगामात आपल्या समस्या मांडण्यासाठी एक अनोखी पद्धत स्वीकारली आहे. "शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही," असे स्पष्ट करत जयपाल यांनी बॅनरबाजी केली. या बॅनरवर लिहिले होते, "मुख्यमंत्री साहेब, मालाला भाव द्या नाहीतर मुलगी बघून द्या."
महाराष्ट्रभर सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे शेतमालाला मिळणारा कमी भाव. जयपाल यांचे म्हणणे आहे की, शेतकरी कुटुंबांमध्ये मुलांकडे पाच ते दहा एकर शेती असूनही मुलींचे पालक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मुली दाखवायला तयार नाहीत.
जयपाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे की, "शेतमालाला योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. त्यानंतर मुलींचे पालक शेतकऱ्यांच्या मुलांना स्वीकारतील."
बॅनरबाजीचे अनोखे रूप:
जयपाल भांडारकर यांनी हातात फलक धरून डोक्यावर पारंपरिक टोप आणि बाशिंग बांधून अनोखी बॅनरबाजी केली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांनी घेतलेली ही कल्पक पद्धत महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाल्यास त्यांच्या आर्थिक समस्या सुटतील, ज्यामुळे समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांचे मुलांना मुलींसाठी चांगले प्रस्ताव येतील, अशी भावना जयपाल यांनी व्यक्त केली.
जयपाल भांडारकर यांची बॅनरबाजी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचे वैयक्तिक जीवन सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.