Pune Session Court Judge Comment: पुण्यातील कुटुंब न्यायालयात पती-पत्नीच्या घटस्फोटाबाबत खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी या प्रकरणातील पक्षकार पत्नीच्या मंगळसूत्र आणि टिकलीबाबत अवमानजनक टिप्पणी केली. न्यायाधीशासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने अशा प्रकारची टिप्पणी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र, ही टिप्पणी म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे पुण्यातील वकील अंकुर आर. जहागीरदार यांनी म्हटले आहे. जहागीरदार यांनीच संबंधित महिलेवर झालेल्या अशा अपमानकारक आणि संतापजनक टिप्पणीवर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामुळे हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे.
पुण्यातील कुटुंब न्यायालयात पती-पत्नीच्या घटस्फोटाचे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. यावेळी न्यायाधीशांनी या प्रकरणातील पक्षाकर असलेल्या पत्नीवर केलेली टिप्पणी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. घटस्फोटात मध्यस्थी करताना न्यायालयाने पत्नीला उद्देशून म्हटले, “तू मंगळसूत्र घालत नाहीस, टिकली लावत नाहीस, अशाने तुझा नवरा तुझ्यात रस का घेईल?” पुण्यातील वकील अंकुर आर. जहागीरदार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सदर टिप्पणीची पोस्ट केली आहे. संबंधित जोडपे गेल्या काही दिवसांपासून वेगळे वेगळे राहत आहेत. तसेच, त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी न्यायालयाने मध्यस्थी केली. मात्र, मध्यस्थी करण्याच्या या अजब तऱ्हेने आणि महिलांसाठी अत्यंत अवमानकारक असलेल्या टिप्पणी करण्याने न्यायव्यवस्था चालवणाऱ्या अनेक घटकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, कौटुंबिक न्यायालयात असे प्रकार घडणे नवीन नाही, असे जहागीरदार यांनी म्हटले आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच हे प्रकरण उजेडात आले. न्यायाधीशांच्या या टिप्पणीवर आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा - तीन वर्षांच्या पीडित मुलीबाबत जिल्हाधिकाऱ्याचं धक्कादायक वक्तव्य; म्हणे, 'तिनेच आरोपीला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल!'
दरम्यान, न्यायालयात सुनावणी सुरू असताना पत्नीने आरोप केला की, तिचा पती तिच्यामध्ये अजिबात रस दाखवत नाही. यावेळी न्यायालयाने या महिलेला सांगितले की, पत्नीने एका विवाहित महिलेप्रमाणे राहायला हवे. वकील जहागीरदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “मला व्यक्तिशः ही टिप्पणी बिलकुल आवडली नाही. पण ही टिप्पणी हिमनगाचे एक टोक आहे. जिल्हा न्यायालयात असे अनेक प्रकारची विधाने केली जातात. कोणत्याही तर्कशुद्ध विचारसरणीच्या व्यक्तीला या टिप्पण्या खटकू शकतात. मला वाटते, आपल्या समाजात अवमानास्पद गोष्टी सहन करण्याची सहिष्णूता आहे. पुरुषप्रधान संस्कृतीची हीच मोठी मेख आहे की, तुम्ही याबद्दल बोलू शकत नाही. दुर्दैवाने न्यायाधीशांनी केलेल्या अशाप्रकारच्या टिप्पण्यांबद्दल तक्रारी करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही.”
https://www.linkedin.com/feed/update/urn:li:activity:7302193452602003456
संपूर्ण समाजाचीच महिलांचे शोषण करण्याची मानसिकता आणि याचे नाव पुरुषप्रधान 'संस्कृती' असल्याचे या प्रकरणावरून दिसत आहे. जगभरातील बहुतेक समाजांमध्ये महिलांनी अशा अवमानास्पद गोष्टी सहन करणे हीच सहिष्णूतेची व्याख्या असल्याचा समज आहे. समाजात याचेच नाव स्त्रीत्व असल्याचे सांगत महिलांना लहानपणापासूनच शोषणाच्या आणि विकृत मानसिकतेच्या बळी ठरण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्याप्रमाणेच त्यांची जडणघडण जाणीवपूर्वक घडवून आणली जाते.
न्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी न्यायाधीशांच्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध केला आहे. जिल्हास्तरीय न्यायाधीशांनाही आता सॉफ्ट स्किल्स आणि संवेदनशीलतेचे धडे दिले जावेत, अशी मागणी एका युजरने केली आहे.
हेही वाचा - Bengaluru: कुंपणानेच शेत खाल्लं तर..? 17वर्षीय बलात्कार पीडिता तक्रार नोंदवायला गेली.. पण पोलिसानेच पुन्हा केला बलात्कार
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशा प्रकारची कोणतीही टिप्पणी अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी असं म्हटलं आहे. न्यायाधीशासारख्या एखाद्या महत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती समोर आलेल्या महिलेला अशा भाषेत बोलत असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे. कारण, अशा मानसिकतेचे न्यायाधीश कौटुंबिक न्यायालयात बसलेले असतील, ते महिलांना काय न्याय देऊ शकणार आहेत? अशा मानसिकतेच्या न्यायाधीशांना कौटुंबिक न्यायालयात राहण्याचा काहीही अधिकार नाही. अशा न्यायाधीशांची तातडीने दुसऱ्या एखाद्या ठिकाणी किंवा पदावर बदली करण्यात यावी, अशी मागणी दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. तसंच, कोणत्याही महिलेचा स्वतःच्या शरीरावर प्रथम तिचा स्वतःचा अधिकार आहे. कायद्याच्या सभ्यतेच्या चौकटीत राहून तिने स्वतःच्या शरीरावर काय कपडे घालावेत, केस कसे असावेत, सौंदर्य प्रधासने कोणती वापरावीत किंवा वापरू नयेत, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार तिचा आहे, असंही त्या म्हणाल्या.