मुंबई : भाजपा प्रदेशाध्यपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नुकतच राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले. या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांना स्थान मिळाले नाही. आधीच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती. त्यामुळे आता त्यांना भाजपा कोणती जबाबदारी देणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. सध्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मात्र नुकतेच राज्यात नागपूर येथे नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले. त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्रशेखर बावनकुळे 2022 पासून भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत. परंतु त्यांना मंत्रीपद मिळाल्याने आता माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी वर्णा लागणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : महायुतीसमोर बीड प्रकरणाचे आव्हान
रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास
रविंद्र चव्हाण हे 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली. 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत सुरुंग लावण्यात रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पालघरमध्येही बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपाचे दोन आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवडून आणला.