Friday, September 13, 2024 11:49:35 AM

WHAT IS MONKEY POX ?
मंकीपॉक्स काय आहे ? काय काळजी घ्यावी ?

मंकीपॉक्स या विषाणूने जगभरात आपले हात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये एम् पॉक्स म्हणजेच मंकी पॉक्सची साथ पसरली आहे. या साथीला जागतिक आरोग्य संस्थेने आरोग्य आणीबाणी म्हणून

मंकीपॉक्स काय आहे  काय काळजी घ्यावी

२४ ऑगस्ट, २०२४, मुंबई : मंकीपॉक्स या विषाणूने जगभरात आपले हात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये एम् पॉक्स म्हणजेच मंकी पॉक्सची साथ पसरली आहे. या साथीला जागतिक आरोग्य संस्थेने आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. यामुळे, आता पुन्हा लॉकडाऊन होणार आहे का अशी चिंताही व्यक्त केली जात आहे. 

M-POX हे या आजाराचं नाव आहे. तर, मन्कीपॉक्स या विषाणूमुळे हा आजार होतो. हा प्राण्यांमधून माणसांकडे येणारा संसर्गजन्य आजार आहे. विविध प्रजातींची माकडं, उंदीर, खारींकडून हा विषाणू माणसांमध्ये येतो. या आजारात अंगावर मोठे मोठे फोड येतात. कांजण्या पसरवणाऱ्या गटामधलाच हा विषाणू आहे. भारतात या विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून भारताच्या सीमावर्ती भागात तपासणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मंकीपॉक्सची लक्षणं काय ?

खूप ताप येणं, हुडहुडी भरणं, स्नायू दुखणं, पाठदुखी, सूज येणं, लाल पुरळ येणं आणि या पुरळांवर खाज येणं, तीव्र डोकेदुखी ही काही मंकी पॉक्सची लक्षणं आहेत. मंकीपॉक्स या आजारात ताप येऊन गेल्यावर अंगावर पुरळ उठते. चेहऱ्यावर फोड यायला सुरुवात होते आणि मग अंगावर इतरत्रही हे फोड येतात. हाताचे पंजे आणि पायाच्या तळव्यांवरही पुरळ येते. ही पुरळ अतिशय खाजरी आणि वेदनादायक असते. काही दिवसांनंतर यावर खपली धरते आणि नंतर ती पडून जाते. पण या पुरळाच्या फोडांचे व्रण कायमचे शरीरावर राहू शकतात.

हा संसर्ग १४ - २१ दिवसांच्या कालावधीत बराही होऊ शकतो. Mpox च्या संसर्गाच्या गंभीर प्रकरणांमध्ये अंगभर, विशेषतः तोंडामध्ये, डोळ्यांमध्ये आणि गुप्तांगावरही पुरळ येते. त्यामुळे, ताप येणं, हुडहुडी भरणं, स्नायू दुखणं, पाठदुखी, सूज येणं, लाल पुरळ येणं यापैकी कोणतीही लक्षणं जाणवली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं दिसू लागताच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

संसर्ग कसा होतो ?  

Mpox हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे, शरीरसंबंध, स्पर्श वा मिठी याद्वारे हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसरीकडे पसरू शकतो. सोबतच बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे - खोकण्याद्वारे किंवा बोलताना उडणाऱ्या तुषारांमधूनही संसर्ग पसण्याची काहीशी शक्यता आहे. तुमच्या त्वचेला भेगा असतील किंवा जखम असेल तर त्याद्वारे, श्वसनमार्गाद्वारे किंवा डोळे - नाक किंवा तोंडाद्वारेही हा विषाणू शरीरात शिरकाव करू शकतो. Mpoxचा संसर्ग असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे, पांघरूण वा टॉवेल वापरल्याने किंवा त्या गोष्टींना स्पर्श केल्यानेही संसर्ग पसरतो.

मंकीपॉक्स वर उपाय काय ?

जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्याला मंकीपॉक्स झाला असेल, तर सर्वप्रथम तुम्ही किंवा मन्कीपॉक्स बाधित रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक आहे. हि खोली हवेशीर असली पाहिजे. Mpox बाधित रुग्णाने मास्क घालणं गरजेचं आहे. तसेच, रुग्णाने पुरळ, फोड नीट झाकले जावेत, यासाठी लांब बाह्याचे आणि पायघोळ कपडे घालावेत. 

काळजी काय घ्यावी ? 

मंकीपॉक्स होउच नये म्हणून आपण आधीपासूनच काही काळजी घेऊ शकतो. मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वतःच्या शरीराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे, वारंवार हात धुतले पाहिजेत. आणि आपल्या भोवतालच्या परिसराचीही स्वछता राखली पाहिजे.


सम्बन्धित सामग्री