Tuesday, July 02, 2024 08:47:49 AM

Vidhansabha
विधानसभेत तिसऱ्या दिवशी काय घडले ?

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात विरोधकांच्या गोंधळाने झाली.

विधानसभेत तिसऱ्या दिवशी काय घडले

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात विरोधकांच्या गोंधळाने झाली. विरोधकांनी आधी विधानसभेच्या पायऱ्यांवर नंतर सभागृहात आंदोलन केले. थोड्या वेळानंतर कामकाज सुरू झाले. लक्षवेधी मांडण्यास सुरुवात झाली आणि सरकारने क्रमाक्रमाने लक्षवेधी प्रश्नांना उत्तरं दिली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तीर्थक्षेत्राच्या यात्रेसाठी 'मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन' अशी योजना काढण्याची मागणी केली. ही मागणी विधानसभेत मंजूर झाली. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना मिळेल. महिलांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल पंधरा हजारावरून वाढवून तीस हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, दहा हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, पन्नास टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे.

आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे 'या' दिवशी मिळणार

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. 

खेळाडूंना शासकीय सेवेत घेणार

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. विधानसभेतील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्द्यांचा भर घालण्याबाबत विचार करू, असे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. 

पेढे कसले वाटता, विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याचे ? - मुख्यमंत्री

विधानसभेच्या प्रांगणात विरोधक अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज आंदोलन करत आहेत. लोकसभेत हरले तरी विरोधक पेढे वाटत आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांना वास्तवाचे भान आणून दिले. तुम्ही जंग जंग पछाडले पण सत्तेत मोदीच आले. पेढे कसले वाटता, लोकसभेत विरोधी पक्षनेत्याचे पद मिळाल्याचा आनंद साजरा करताय का ? अशा स्वरुपाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सर्वांना न्याय देणारा राज्याचा अर्थसंकल्प बघून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले आहेत. खोटं बोलून ज्यांची मतं घेतलीत ते पण आमच्याकडे आलेत असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. 


सम्बन्धित सामग्री