रायगड : श्रीवर्धन, मुरुड या दोन तालुक्यांतील पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या दिघी जलवाहतुकीचा कारभार विस्कळीत झाला आहे. येथून दिघी ते आगरदांडा या जलमार्गावर दोन बोटींतून होणारा प्रवास आता एका बोटीने होत असल्याने प्रवास खोळंबला आहे. दिघी येथे अधिकृत जलवाहतूक करणाऱ्या सुवर्ण शिपिंग मरिन सर्व्हिसेस आणि दिघी जलवाहतूक संस्था अशा दोन फेरी बोटींतून सेवा दिली जात आहे. दिघी ते आगरदांडा येथून सुरू होणारा प्रवास सकाळी आठ वाजताच्या फेरी बोटने नियमित सुरू होता. श्रीवर्धनहून जिल्ह्याच्या ठिकाणी अलिबाग येथे जाण्यासाठी प्रवासाची तयारी असायची. मात्र, यातील एक बोट बंद असल्याने दीड ते दोन तासांची प्रवासाची रखडपट्टी करावी लागत आहे.