नाशिक : "वसुबारस" या दिवसापासून दिवाळीला सुरवात होते. गायीगुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गायीला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. नाशिकच्या संभाजी रोडवर असलेल्या ऊर्जा गोशाळेत देखील वसुबारस या दिवशी गायीचे पूजन संपन्न झाले. गायीचे मनुष्य जीवनात खूप मोठे महत्त्व आहे गायीपासून अनेक गोष्टी मनुष्याला मिळतात. त्यामुळे गायीची पूजा करून गायीबाबत कृतज्ञता व्यक्त केली जात असल्याचे या गोशाळेचे संचालक सत्यजित शहा यांनी सांगितले.