नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई आयुक्तालयातून २२ निरीक्षकांचा समावेश आहे. त्याजागी नव्या २२ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या नियमानुसार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. आयुक्तालयात चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले व सलग तीन वर्षे पोलिस ठाण्यांमध्ये कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची नावे मागवण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यात नवी मुंबईतील २२ पोलिस निरीक्षकांची मुंबईसह इतर ठिकाणी बदली केली आहे. काही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचाही यात समावेश असून, काहींनी महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारला होता. अशांनादेखील अनपेक्षित बदल्यांना सामोरे जावे लागले आहे. त्याजागी नव्या २२ निरीक्षकांची नवी मुंबई आयुक्तालयात नियुक्ती केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या बदल्यांमुळे अनेक पोलिसांचे तोंड कडू झाले आहे.