नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळ रविवारी रात्री धडकण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. 'रेमल' चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात समुद्रात १.५ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो. हवामान खात्याने मच्छिमारांना २७ 'मे'च्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. 'रेमल'च्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाची शक्यता आहे.
'रेमल' चक्रीवादळामुळे, कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१ तासांसाठी बंद राहणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने नऊ आपत्ती निवारण पथके समुद्रात तैनात केली आहेत. याशिवाय बंगालमध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. बंगाल सरकारने शनिवारी एक बैठक घेतली आणि चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला.