रायगड : रायगड-पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील रस्ता खचला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारपासून ५ ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटात रस्ता एका बाजूने खचला आहे. या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे.