वॉशिंग्टन : कॅनडाचा नागरिक तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील तुरुंगात आहे. राणाचा ताबा भारताला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप राणावर आहे.
भारताने राणाचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना अडथळा निर्माण करण्यासाठी तहव्वूर राणाने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने राणा विरोधात निकाल दिला. यामुळे तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता वाढली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात हस्तांतराचा करार आहे. या करारांतर्गत अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या तहव्वूर राणाचे भारताकडे हस्तांतर होऊ शकते; असा निकाल न्यायालयाने दिला. कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने आधी राणाला भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते असा निकाल दिला होता. या निकालाविरोधात राणाने अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपील येथे दाद मागितली होती. या न्यायालयाने राणाची याचिका फेटाळली आणि राणाला भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते, असे सांगितले.