२७ सप्टेंबर, २०२४, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बाघोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या मदतीने या पुलावरून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे. बोरगाव, मरारटोली, सीलेगाव या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुऱ्हाडी येथे जावे लागते. मात्र, मधातच बाघोली या गावाच्या लगत एक नाला पडतो. नाल्यावरील पूल हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमी पूर चढत असतो. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची मागणी प्रलंबित असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अजूनही पुलाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिक्षणासाठी जात असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.