रामेश्वरम : तामिळनाडूतील रामेश्वरम येथून मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या २३ भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याचा आरोप मच्छिमारांवर ठेवण्यात आला आहे. पकडलेले मच्छिमार शनिवारी नेदुनथीवु येथे मासेमारी करत होते. त्यावेळीच तिथे श्रीलंकेचे नौदल पोहोचले आणि त्यांनी मच्छिमारांसह तीन बोटी देखील ताब्यात घेतल्या. अटक करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांना कांगेसंथुराई नौदल छावणीत नेण्यात आले अशी माहिती मिळाली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेल्या मच्छिमारांना जाफना मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले आहे. याआधी २८ सप्टेंबरला श्रीलंकेने १७ मच्छिमारांना अटक केले होते. आता श्रीलंकेच्या अटकेत असलेल्या मच्छिमारांच्या सुटकेसाठी भारत सरकार काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.