ठाणे : नोव्हेंबर सुरू होऊनही भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. टोमॅटो, फरसबी, काकडी, तोंडली वगळता सर्वच भाज्यांनी शंभरीचा उंबरठा गाठला आहे. दिवाळीआधी भाज्यांचे दर वाढले होते. दर कमी होतील, अशी अपेक्षा असताना दर अद्याप कमी झाले नसल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे. सध्या नवीन भाज्यांची आवक सुरू झाली नाही. भाज्यांचे दर कमी व्हायला अजून १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांनी आवक घटल्याने दर वाढलेले आहेत, अशी माहिती भाजी विक्रेते भगवान तुपे यांनी दिली.