बारामती : राजकीय वितुष्ट सणावरही आलंच. बारामतीत यंदा शरद पवार आणि अजित पवार यांनी दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे साजरा केला. एरवी दरवर्षी शरद पवारांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमायचे. तिथेच दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम व्हायचा. या निमित्ताने शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे समर्थक पवारांच्या बारामतीच्या घरी येऊन नेत्यांचे आशीर्वाद घ्यायचा. पण यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या घरी जाण्याऐवजी स्वतंत्ररित्या दिवाळी पाडवा साजरा केला. समर्थक नेत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या घरी गेले होते.
निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्वातील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. तसेच शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यानंतर हळू हळू शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा राजकीय दुरावा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ठळकपणे समोर आला.
राजकीय वितुष्ट सणावरही आलंच
पवार कुटुंबाची प्रथा मोडली
काका आणि पुतण्याने साजरे केले आपापले पाडवे