Tuesday, September 17, 2024 09:05:55 AM

Sadhguru
स्वातंत्र्यदिनी सद्गुरूंचा कठोर संदेश

भारताच्या स्वातंत्र्यदिनी, सद्गुरूंनी शांततेच्या शोधात होणाऱ्या संघटित प्रयत्नांकडे लक्ष वेधले, जे शांततेची इच्छा बाळगतात त्यांनी संघटित होऊन निर्णायकपणे कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्यदिनी सद्गुरूंचा कठोर संदेश

नवी दिल्ली : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी, सद्गुरूंनी शांततेच्या शोधात होणाऱ्या संघटित प्रयत्नांकडे लक्ष वेधले, जे शांततेची इच्छा बाळगतात त्यांनी संघटित होऊन निर्णायकपणे कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. "जसे युद्धात गुंतवणूक करणारे स्वत:ला संघटित करतात, त्याचप्रकारेच शांततेची आकांक्षा बाळगणाऱ्यांनी देखील एकत्रित येणे आवश्यक आहे," असे त्यांनी जाहीर केले. "निष्क्रिय उदासीनते"ला  शांतता समजू नये असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला, आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्रिय आणि सहकार्याचा दृष्टीकोन बाळगण्यावर जोर दिला.

भारताच्या इतिहासाचा मागोवा घेताना, सद्गुरूंनी ब्रिटीश वसाहतवादाच्या दीर्घकालीन प्रभावावर टिप्पणी केली, “जेव्हा दोनशे वर्षांच्या कारभारानंतर इंग्रज निघून गेले, तेव्हा त्यांनी केवळ आपली संपत्तीच हिरावून नेली नाही, तर राष्ट्र पुन्हा उभारण्यासाठी उपयुक्त असे आपले शिक्षण, उद्योग आणि इतर अनेक व्यवस्था उद्ध्वस्त केल्या."

"स्वातंत्र्यानंतर भारताने लक्षणीय प्रगती केली असली तरी, आपल्याला याहून उच्चतम आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत." यावर त्यांनी भर दिला. "भारताने फक्त भारत असणे पुरेसे नाही, तर भारताने महा-भारत बनले पाहिजे," असेही ते पुढे म्हणाले. “हजारो वर्षांपासून या पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा लोकांनी आंतरिक कल्याण आणि स्थिरता शोधली, तेव्हा ते स्वाभाविकपणे भारताकडे वळले. पुन्हा एकदा, मानवतेसाठी आपण अशी शक्यता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. हे व्हायचे असेल तर प्रथम भारताला महा-भारत बनवावे लागेल. महा-भारत बनणे म्हणजे या भूमीतील लोकांनी अशा चैतन्य आणि समतोल भावनेने जगले पाहिजे की, उर्वरित जगानेही तसे बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे.” या परिवर्तनासाठी राष्ट्राच्या अध्यात्मिक धाग्याची वीण घट्ट करण्याची गरज आहे, जी खरे चैतन्य आणि समतोल साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे त्यांनी सांगितले.

सद्गुरूंनी वाढते संघर्ष आणि मानसिक आरोग्याचे संकट यासोबत व्यापक जागतिक आव्हानांना देखील संबोधित केले. त्यांनी अधोरेखित केले की, भारताच्या संस्कृतीचे सार असणारी - सर्वसमावेशकता - उपायकारक आहे. “जेव्हा आपण भारत म्हणतो, तेव्हा ती एकाधिकारशाही संस्कृती नाही, किंवा 'तुम्ही विरुद्ध मी' नाही; ही सर्वसमावेशक संस्कृती आहे,” असे त्यांनी नमूद केले. “अनेक स्तरांवर जागतिक समुदाय आणि राष्ट्रांमध्ये संघर्ष दिसत आहे. लोकांमध्ये वैयक्तिक पातळीवर सुद्धा खूप संघर्ष सुरु आहे; या जगात मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.”

सद्गुरूंनी यावर उपाय सुचवत हे निदर्शनास आणून दिले की, "वैयक्तिक स्तरावर, केवळ सर्वसमावेशक वृत्तीनेच आपण आनंद, शांती आणि संतुलन अनुभवू शकतो. जेव्हा 'तुम्ही एक' आणि 'दुसरा एक' असे नसते, तेव्हा कोणताही संघर्ष रहात नाही. प्रत्येक व्यक्तीला संबोधित केल्याशिवाय, जागतिक शांततेबद्दल बोलणे आपल्याला कुठेही नेणार नाही,” असे सांगत सद्गुरूंनी चिरंतन जागतिक शांततेचा मार्ग  अधोरेखित केला.


सम्बन्धित सामग्री