मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली. संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता.
विधानसभा निवडणूकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेस आणि विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपामुळे शुक्ला यांना पदावरून काढण्यात आले होते. काँग्रेसकडून हा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असणाऱ्या रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरता असा शब्द वापरण्यात आला होता.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणूकीत महायुतीचा विजय झाला. विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागल्याने त्यांचेच सरकार येणार हे नक्की आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्या भेटीनंतर लगेचच रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.