Sunday, June 30, 2024 09:33:32 AM

Rahul Gandhi
'शेअर बाजारात घोटाळा'

शेअर बाजारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला.

शेअर बाजारात घोटाळा

नवी दिल्ली : शेअर बाजारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर जनमत चाचणी झाली. यानंतर सोमवार ३ जून रोजी शेअर बाजाराने मोठी उसळी मारली. शेअर बाजार अनपेक्षिरित्या वधारला. यानंतर मंगळवार ४ जून रोजी निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आणि शेअर बाजार कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे राहुल गांधी म्हणाले. हा एक ठरवून केलेला घोटाळा आहे. या व्यवहारांमुळे विशिष्ट कंपन्यांना आणि ठराविक गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली. 

प्रचार सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी आता शेअर बाजार वधारणार अशा स्वरुपाची वक्तव्ये केली. यानंतर हा घटनाक्रम घडला आहे. यामुळे भाजपाने ठरवून शेअर बाजारात कृत्रिम तेजी आणली आणि नंतर विक्रीद्वारे ठराविक लोकांना फायदा मिळवून दिला, असाही आरोप राहुल गांधींनी केला.

हिंडनबर्ग प्रकरणात हात होता ?

राहुल गांधींच्या आरोप हास्यास्पद आहे. शेअर बाजारात चढउतार होतच असतात. पण राहुल गांधींनी विशिष्ट उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध भूमिका घेणे आणि हिंडनबर्ग नावाच्या विदेशी संस्थेने त्याच कंपन्यांबाबत नकारात्मक अहवाल देणे. यानंतर शेअर बाजारात ठराविक शेअरमध्ये काही काळ टोकाची घसरण झाली. हा एक कृत्रिम घसरणीचा घोटाळा आहे. या सगळ्यामागे राहुल गांधी यांचा हात होता काय ? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी उपस्थित केला.

'भारतीय शेअर बाजार ४०० लाख कोटींचा'

काँग्रेस सत्तेत असताना मे २०१४ मध्ये शेअर बाजारात ६७ लाख कोटींची भांडवली गुंतवणूक होती. या उलट मोदी सरकारच्या काळात आर्थिक प्रगती झाली. यामुळे जून २०२४ भारतीय शेअर बाजारातील भांडवली गुंतवणूक ४०० लाख कोटींवर जाऊन पोहोचली आहे, असे भाजपा नेते पीयूष गोयल म्हणाले. राहुल गांधींच्या आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार येणार असा विचार करून विदेशी गुंतवणूकदारांनी चढ्या दराने खरेदी केली. पण निवडणूक निकाल यायच्या वेळी थोडा वेळ संभ्रमावस्था होती. या काळात घाबरून विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना तोटा झाला, त्यांनी कमी दराने विक्री केली. पण भारतीय गुंतवणूकदारांनी कमी दराने खरेदी करून स्वतःचा फायदा करून घेतला. शेअर बाजारात भारतीय गुंतवणूकदारांना फायदा झाला. निकाल सुपष्ट झाला आणि मोदीच पुन्हा सत्तेत येत असल्याची खात्री झाल्यावर शेअर बाजार पुन्हा वधारला आहे. यामुळे शेअर बाजारातील चढउताराने भारतीय गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले नाही; असे पीयूष गोयल म्हणाले.


सम्बन्धित सामग्री