अहमदाबाद - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.
पाकिस्तानचा झेंडा असलेल्या तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असं लिहिलेल्या टाइल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही या टाइल्स बनवल्याची माहिती टाइल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी दिली. 'मागणी वाढेल त्याप्रमाणे आम्ही यांचे उत्पादन वाढवणार आहोत. मोरबी येथील सर्वाजनिक शौचालय बांधण्यासाठी या वापरल्या जातील. पण जर या टाइल्सना दुसऱ्या ठिकाणांहून मागणी आली तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत' असं सुरेश कौसुंदरा यांनी सांगितलं आहे.