पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील अहमदाबाद येथून ऑनलाईन पद्धतीने सहा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले. यातील तीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातून सुटणार आहेत.
पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, खासदार मेधा कुलकर्णी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. या गाडीमुळे कोल्हापूर, सांगली तसेच मिरज येथील नागरिकांना लाभ होणार आहे.
- कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस
- पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस
- नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस
कोल्हापूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारपासून शुभारंभ होत आहे. कोल्हापूर-पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २:१५ वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी ती कोल्हापूर स्थानकात दाखल होईल. ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे.