बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. आधी खासगी क्षेत्रात आरक्षण आणण्याच्या मुद्यावरुन वाद झाला. आता कामाचे तास वाढवण्याच्या मुद्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
सध्या कर्नाटकमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांमध्ये दहा तासांची ड्युटी आहे. यात काम, खाण्यापिण्याची वेळ तसेच थोडा वेळ घेतलेली विश्रांती या सगळ्याचा विचार करण्यात आला आहे. आता कर्नाटक सरकार राज्याच्या दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने कायद्यात तरतूद करुन चौदा तासांची ड्युटी करण्याबाबत विचार करत आहे. कायद्यात बदल केला तर राज्यातील खासगी क्षेत्रातील कर्मचारी - अधिकारी यांचे रोजचे कामाचे तास वाढतील. खासगी क्षेत्रात दररोज चौदा तास काम करावे लागेल. सरकारच्या विचाराधीन असलेल्या या प्रस्तावावरुन कर्नाटकमधील अनेक कामदार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामाचे तास वाढवण्याचा अमानवी निर्णय घेऊ नका, अशी मागणी अनेक कामगार संघटनांनी केली आहे.
कामाचे तास वाढवले तर कामगारांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होईल. अनेकांचे रोजगार जाण्याचीही शक्यता आहे. सध्या अनेक खासगी आस्थापनांमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम चालते. पण चौदा तास काम करावे लागले तर फक्त दोन पाळ्यांमध्येच काम चालेल. तिसऱ्या पाळीची गरज भासणार नाही. यामुळे काही कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे; अशी भीती कामगार संघटना व्यक्त करत आहेत.